बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पासपोर्ट कार्यालयासाठी पाठपुरावा केला होता. शिवाय 2016 मध्ये अधिवेशनात सभागृहात याबाबत मागणीही केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
मराठवाड्याला पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई किंवा नागपूर हे दोनच पर्याय होते. त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असली तरीही पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयात जाणं आवश्यक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला या पासपोर्ट केंद्राचा मोठा फायदा होणार आहे.
व्यापार, उद्योग, शिक्षण, पर्यटन यांचा विचार करता मराठवाड्यातून परदेशात जाणार्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र औरंगाबाद शहरातील पासपोर्ट कार्यालय बंद झाल्याने त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी जावं लागत होतं. यासाठी 600 ते 800 किलोमीटरचा प्रवास करावा लागूनही त्यात काही त्रुटी राहिल्यास नागरीकांना पुन्हा दुसर्यांदा त्या ठिकाणी जावं लागत होतं.
दरम्यान प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट काढता येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्येही पासपोर्ट काढता येणार आहे.