या प्रकरणी रात्री संशयित फरार आरोपी भरत जोशी याला ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत जितू गंभीर, जाकीर शेख, हमीद शेख, मोहन दुग्गल, मुलगा सोनू आणि शेखर जाधव आणि सेनेचा जिल्हा उपप्रमुख भिमराव आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.
दारु कांडात आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शनिवारी पकडलेल्या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यपानाने आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे. बनावट दारु प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचले आहेत. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं आहे.
कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. त्यामुळे यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते.