सोलापूर : आषाढीच्या वारीसाठी राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपुरात प्रवेशासाठी पासेस दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जर कोणते पास जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतील तर ते कोणतेही पास ग्राह्य धरले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज कोरोनाविषयक आढावा घेण्यासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


पंढरीची वारी ही वारकऱ्यांचे जीवन असून पांडूरंग हा त्यांचा आत्मा आहे. मात्र यंदाची ही परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे 30 जूनला ज्या मानाच्या पालख्या निघणार आहेत. त्या विमानाने, हेलिकॉप्टर की रोडच्या प्रवासाने आणाव्यात याबाबत चर्चा सुरु असून लवकरच कळवले जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यावेळी त्यांनी आषाढी वारीचा सविस्तर कार्यक्रम कसा असणार याबाबत देखील माहिती दिली. 30 जूनपर्यंत सर्व मानाच्या पालख्या पंढरीत दाखल होतील. 1 जुलै रोजी पालख्या चंद्रभागेत स्नान करतील. पंढरीच प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांच्या मठात दाखल होतील. 2 जुलै रोजी मंदिरात पालख्यांची भेट झाल्यानंतर संध्याकाळी या पालख्या आपल्या ठिकाणी प्रस्थान करतील.


मात्र मानाच्या 9 पालख्यामध्ये फक्त 18 ते 20 वारकरी राहतील. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत दिली. पंढरीत इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यासाठी बाहेरच्या कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी पासेस देऊ नयेत अशा सुचना देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिल्या.


राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तमरित्या काम केलं असल्याचे देखील गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. पोलिस विभागीत कर्मचाऱ्यांनी देखील उत्तम काम केलं. हे करत असताना पोलिस दलातील आतापर्यंत 58 सहकाऱ्यांना प्राण देखील गमावावे लागले आहेत. मात्रार या सर्व पोलिसांना मदत मिळवून देण्याचे काम शासन म्हणून करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान ज्या पोलिसांनी फ्रंटलाईनवर राहून काम केलं त्यांच्या कामाबद्दल शौर्य पदक देखील पोलीस खात्याच्या माध्यमातून देण्यात येईल अशी घोषणा देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.


Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार