सोलापूर : सोलापुरातील बेपत्ता वकिलाचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला आहे. अॅड राजेश कांबळे बेपत्ता असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तालयात देण्यात आली होती. त्यांचा शोध सुरु असताना मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेलं पोतडं आढळल्याने एकच खळबळ उडाली.


एक मोठी केस मिळणार असल्याचं सांगून राजेश घरातून बाहेर पडले मात्र ते घरी परतलेच नाहीत. अॅड. राजेश कांबळे गायब असल्याची तक्रार मंगळवारी सोलापूर बार असोसिएशनने पोलिस आयुक्तालयात दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी कांबळे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

गेल्या पाच दिवसांपासून पांडुरंग वस्तीतील घर बंद असून दुर्गंध येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पांडुरंग वस्तीमधील घरात आज मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेलं पोतं आढळून आलं.

राजेश कांबळे अगदी शांत आणि संयमी स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा घातपात कोणी करु शकेल अशी शंकाही कोणी घेऊ शकत नव्हतं. 15 दिवसांपूर्वी आपल्याला बंटी खरटमल याच्यामार्फत मोठी केस मिळणार असल्याचं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. याच संशयावरुन बंटी खरटमलच्या घरी पोलीस तपासासाठी गेले आणि मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेले पोतेच हाती लागले.

राजेश कांबळे यांच्या अंगावर सात ते आठ तोळे सोनं असायचं, खिशात महागडा मोबाईल आणि नुकतीच घेतलेली गाडीही होती. मात्र आता त्यांच्या अंगावरचं सोनं घटनास्थळावरुन गायब आहे. त्यामुळे पैशांसाठी ही हत्या झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ज्या घरातून अॅड. राजेश कांबळे यांचा मृतदेह हाती लागला, त्या परिसरात दुर्गंधी पसरली होती मात्र परिसरातल्या नागरिकांनीही कोणती तक्रार दिली नाही. ज्या बंटी ऊर्फ संजय खरटमलवर संशय व्यक्त केला जात आहे, तोसुद्धा बेपत्ता आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने शंका आणखी बळावली आहे. त्यामुळे नेमकी ही हत्या कशामुळे करण्यात आली हे आरोपींच्या अटक आणि तपासानंतरच स्पष्ट होईल.