शिर्डी : भाजप प्रवेश हा मुद्दा आज राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे, असं स्पष्ट मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रवेश औपचारिकता राहिली असल्याचं स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचं समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरु त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काँग्रेसने माझी कोंडी केली असून आता पक्षात माझी घुसमट होत असल्याचं त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलं होतं. काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या अधोगतीबाबत चिंतन करण्याचा काँग्रेसचा विषय संपला आहे, असा टोलाही यावेळी राधाकृष्ण विखे यांनी लगावला. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. या नेत्यांनी आता स्वतःहून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याची टीका अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता त्यांनी केली.