Parli Election: राज्यभरातील अनेक महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका आगामी काही महिन्यांमध्ये होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर परळी नगरपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आतापासूनच तयारी सुरू केलीय. परळी शहरातील हालगे गार्डन मध्ये दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी साडीचोळी देऊन सत्कार केला. तसेच परळी नगरपालिका निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर लढू व जिंकू, असाही विश्वास पंकजा मुंडेंनी त्यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मूठ बांधून काम करावं. तुमच्या वर माझा विश्वास आहे. परळी नगरपालिकामध्ये माझी वानर सेना लढणार आहे. फाटक्या, सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. मी कधी नीतिमत्ता गहाण ठेवून राजकारण केलं नाही. त्यामुळं मला नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार मिळणार नाही, असं म्हणणार्यांच्या विरोधात माझी वानरसेना पूर्ण ताकतीने लढणार आहे. मला निवडणूक अवघड असली तरी माझ्यातली लढण्याची ताकद अजून संपलेली नाही, असा इशारा देखील पंकजा मुंडे यांनी विरोधकांना दिलाय.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात परळी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपाला उमेदवार मिळणार नाहीत असे आव्हान दिले होते. याचा समाचार घेत पंकजा मुंडे यांनी आपण परळी नगरपालिका निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर लढू व जिंकू असा विश्वास व्यक्त केलाय.
या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी मला कोणावरही टीका करायची नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांना मात्र सणसणीत टोला लगावलाय. परळी हा गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ आहे आणि तो एवढा सोपा नसून कोणाची पतंग किती उंच गेल्यावर कापायची ते परळीच्या लोकांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं सत्ताधारी पेक्षा मला जास्त उचक्या लागत आहेत आणि मी केलेल्या कामाची आठवण लोक आताही काढत आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-