बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची शक्ती पणाला लागली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरुवात होईल. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत.
लाईव्ह अपडेट :
- 18 पैकी 7 जागांचा निकाल- राष्ट्रवादी-4, भाजप-3
- परळी बाजार समिती निवडणूक निकाल : राष्ट्रवादी - 3, भाजप - 2
- बीड - परळी बाजार समिती निकाल : पहिल्या दोन जागांचे निकाल हाती, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक-एक जागा
गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे.
पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला. आता गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा हयात नाहीत. त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले आहे, तर धनंजय यांनी आपल्या पॅनलला पंडितअण्णा यांचे नाव दिले आहे.
परळी नगरपालिका ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंचा मोठा पराभव धनंजय मुंडेंनी केला होता.
परळी बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपसोबत संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी करुन ही निवडणूक लढत आहेत. धनंजय मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळात ही बाजार समिती नफ्यात आणल्याचा दावा राष्ट्रवादी करते आहे, तर केवळ पराभवाच्या भीतीपोटी पंकजा मुंडेंनी मतदारांना सहलीवर पाठवल्याचा आरोप राष्ट्रवादी करते आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत परळीत पंकजा मुंडेंना एकही जागा जिंकता आली नव्हती, तरीही राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांना फोडून तडजोडीच्या राजकारणातून जिल्हा परिषद ताब्यात आणली.