श्रीरामपूरः आई वडिलांना एबीसीडी येत नसलं तरी मुलांना मात्र इंग्रजी शाळेत टाकण्याचं फॅड सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. त्यामुळं मराठी शाळा, विशेषतः सराकारी मराठी शाळा ओस पडलेल्या दिसतात. पण तुम्ही श्रीरामपूरच्या मराठी शाळांचा फेरफटका माराल तर तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळेल. श्रीरामपूरमध्ये पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी शाळेत टाकलं आहे.

 

 

तब्बल 2 वर्षानंतर श्रीरामपूर तालुक्यातील झेडपीच्या शाळेबाहेर, प्रवेश हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. पुन्हा एकदा इथल्या मराठी शाळेच्या अंगणात चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतोय. विद्यार्थ्यांचा गोंगाट ऐकून शाळेच्या निर्जीव भिंतींनाही जिवंत झाल्यासारखं वाटत आहे.

 

 



 

 

संपूर्ण तालुक्यात इंग्रजी ऐवजी मराठी शाळांना पसंती

हे चित्र फक्त केशव गोविंद बन शाळेपुरतं मर्यादीत नाही. तर अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील 124 मराठी शाळांमधले ऍडमिशन जवळपास पूर्ण झाले आहेत. ऐवढंच नव्हे तर, 216 मुलांनी इंग्रजी शाळेला गुडबाय करून मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे.

 



 

 

श्रीरामपूर तालुक्यातील मराठी शाळांनी पूर्णपणे कात टाकली आहे. इथे मुलं गणितं सोडवत नाही, तर खेळतात, फळ्याची जागा एलईडी स्क्रीनने घेतली आहे. काळाची गरज ओळखून अनेक शाळांमध्ये सेमी इंग्लिश अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळं मराठी शाळेत शिकुनही आपलं लेकरू स्पर्धेच्या युगात गरूडझेप घेऊ शकतं, असा विश्वास पालकांच्या मनात रुजू लागला आहे.

 

हा आदर्श इतर पालक आणि शाळा घेणार का?

प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला पाहिजे, असं अनेक शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. मात्र शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या काही संस्थांनी कॉन्व्हेन्टचा लेबल लाऊन इंग्रजी शाळांची दुकानं उघडली. पण त्याचा फायदा किती झाला? हा प्रश्नच आहे.

 

 



 

 

श्रीरामपूर तालुक्यातील मराठी शाळांनी कायापालट करून पालकांचा आत्मविश्वास पुन्हा जिंकून दाखवला आहे. त्यामुळे राज्यातल्या इतर मराठी शाळांनीही श्रीरामपूर पॅटर्न राबवला तर मराठी शाळांना पुन्हा सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.