जम्मू-काश्मीर/परभणी : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीमधील एक 20 वर्षीय जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी झाले आहेत. पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापुरे शहीद झाले आहेत.


शुभम यांच्या पश्चात आई सुनिता असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम मुस्तापुरे हे सैन्यातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असे सैन्याने म्हटले आहे.



जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले आहेत. तर शुभम मुस्तापूरे यांनाही वीरमरण आलं. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी झालेल्या चकमकीत 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.