भंडारा : भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शेळीच्या शिकारीसाठी घराच्या आवारात शिरलेल्या बिबट्याला मोठ्या हिमतीने एका युवतीने परतवून लावलं. बिबट्याशी झुंज करत स्वतःसह आणि आपल्या आईचे प्राण तिने वाचवले. रुपाली मेश्राम असं या वाघिणीचं नाव आहे.


...आणि बिबट्याने रुपालीवर हल्ला केला
24 मार्चला रुपाली मेश्राम आणि तिची आई जिजाबाई झोपलेल्या असताना, रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला. गोठ्यात बांधलेल्या शेळीच्या ओरडण्याचा आवाजामुळे रुपाली अंगणात आली. रक्तबंबाळ अवस्थेतील शेळी पाहून रुपाली भेदरली. मात्र तेवढ्यात बेसावध रुपालीवरच बिबट्याने हल्ला चढवला.

बिबट्यावर दुहेरी हल्ला
वेळेचं गांभीर्य ओळखून रुपालीने काठीने वाघावर प्रहार सुरु केले. जिवाच्या आकांताने तिने आरडाओरडा सुरु केला. त्या आवाजाने आईने तिथे धाव घेतली. अनपेक्षितपणे वाघावर दुहेरी हल्ला सुरु झाला. अखेर भेदरलेल्या वाघाने धूम ठोकली. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या मायलेकींनी घरात धाव घेत कडी लावून घेतली.

रुपालीच्या धाडसाचं कौतुक
बिबट्याच्या हल्ल्यात रुपाली आणि तिची आई जखमी झाल्या. वनअधिकाऱ्यांनी सुरुवातील दोघींना प्राथमिक उपचारासाठी साकोली रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुपालीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. रुपालीला आठवडाभरानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र रुपालीच्या धाडसाचं राज्यभर कौतुक होत आहे.