औरंगाबादहून हैदराबादकडे जाणाऱ्या गाडीत 21 मार्च रोजी ही घटना घडली. ही पॅसेंजर गाडी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान सेलू स्थानकावर पोहोचली असता हा प्रकार घडला. यातून प्रवास करणारं एक कुटुंब आणि तीन तरुणांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद सुरु झाला. तिघांपैकी एका तरुणाने कुटुंबातील महिलेला खाली पाडून लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
बोगीत सर्व प्रवाशांसमोर हा प्रकार सुरु होता. पण कोणीही त्याला रोखण्यासाठी पुढे आलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. यामुळे मारहाण करणाऱ्याला आणखी बळ मिळालं आणि त्यातून तो अधिक त्वेषाने त्या महिलेला मारु लागला. या मारहाणीत महिलेचे कपडेही फाटले, तरीही बघ्यांची भूमिका बदलली नाही.
दहा ते पंधरा मिनिटं हा प्रकार सुरु होता. महिलेची मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करत होती. पण कोणीही पुढे येऊन त्या युवकाला रोखलं नाही. उलट एका प्रवाशाने मारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केली आणि हा व्हिडीओ व्हायरल केला.
पण रेल्वे स्थानकावर हा प्रकार सुरु असताना रेल्वे पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणा काय करत होती, हा प्रश्न आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी औरंगाबादमधील रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे.
पाहा व्हिडीओ