परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जायचे-यायचे असल्यास रेल्वे फाटक ओलांडून जावे लागते. रेल्वे येणार आणि जाणार असली की हमखास या रेल्वे फाटकावर थांबावे लागते. त्यामुळे विद्यापीठात जाण्या-येण्यासाठी उड्डाणपूल बांधवा अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जायची. ती दोन वर्षांपूर्वी मान्य झाली अन् प्रत्यक्ष कामाला ही सुरुवात झाली. मागच्या दोन वर्षात याठिकाणी भव्य मोठे पिलर उभारण्यात आले. परंतु कालपासून अचानक जेसीबीच्या सहाय्याने हे पिलर पाडण्यात येत आहेत. त्यामुळे परभणीकरांना हे काम होणार नाही का असा प्रश्न पडला आहे.


परभणी शहरातील विष्णू जिनिंग मैदानापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. मात्र याच रस्त्यावर रेल्वेचे फाटक आहे. त्यातल्या त्यात रेल्वे स्थानक हे अत्यंत जवळ आहे. त्यामुळे इथे येणारी प्रत्येक रेल्वे असो, इंजिन बदली असो किंवा इतर काही कामं होत असताना इथे फाटक लागते. त्यामुळे विद्यापीठात जाणाऱ्या प्रत्येकाला इथे गेट उघडेपर्यंत थांबावे लागते. याचा फटका फक्त सामान्यांनाच किंवा विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनाच बसला नाही तर अनेक बड्या नेत्यांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे इथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती, जेणेकरून हा त्रास थांबेल.


सन 2020 ला या उड्डाणपूल कामाला मंजुरी मिळून हे काम सुरु झाले. मध्यंतरी कोरोनाचा ब्रेक लागल्याने हे काम अतिशय संथगतीने सुरु होते. दोन वर्षात इथे खोदकाम करून, लोखंडी साहित्यासह सिमेंटचे भव्य असे पोल उभारण्यात आले. जवळपास 10 पोल आणि भिंत इथे बांधण्यात आली. जे कालपासून तोडण्यात येत आहेत. अतिशय भव्यदिव्य असे पिलर आणि तेही सुस्थितीत असलेले हे पिलर तोडले जात असल्याने परभणीकरांसह विद्यापीठातील स्टाफही अवाक् झाला असून सर्वांना उड्डाणपूल करणेच रद्द झाले की काय असा प्रश्न पडलाय.


यावर रेल्वेचे परभणी स्टेशन मास्तर अरविंद इंगोले यांच्याशी संवाद साधला आणि पिलर तोडणाऱ्या जेसीबी चालकांना विचारले असता त्यांनी ज्या पिलरचे काम झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले आहे असं सांगितलं. याची चोकशी करून रेल्वेच्या अधिकाकाऱ्यांनी हे पिलर पुन्हा नव्याने, दर्जा टिकवून ठेवत करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले असल्याचे कळते 


दरम्यान, एक नव्हे तर दोन वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने हा मार्ग बंद करण्यात आलाय. त्यातच एवढ्या दिवसात बांधण्यात आलेले पिलर तोडण्यात येत असल्याने आता पुन्हा नव्याने हे पिलर केव्हा बांधण्यात येणार आणि हा उड्डाणपूल सुरु केव्हा सुरू होणार असा प्रश्न परभणीकरांना पडलाय.