परभणी: साई बाबांच्या जन्मभूमीवरून पाथरी(Pathari) विरुद्ध शिर्डी सुरु झालेल्या वादावर विकास आराखड्याचा तोडगा काढण्यात आला खरा मात्र तोच पाथरीतील साई जन्मभूमीचा विकास आराखडा शासन दरबारी मागच्या तीन वर्षांपासून रखडला आहे. तीन वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले मात्र विकास निधी काही मिळाला नाही. तत्कालीन राष्ट्रपतींचे आश्वासन,तत्कालीन मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच जिरल्याने पाथरी चा विकास आराखडा मंजूर होणार का आणि त्याला निधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जगभरातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साई बाबा. मात्र साई बाबांचे जन्मस्थान पाथरी की शिर्डी यावरून मागची अनेक वर्ष वाद सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात साई जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख केला. स्वतः येऊन दर्शन घेतले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात साई जन्मभूमीचा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि जानेवारी 2020 साली मुख्यमंत्री ठाकरेंनी साई जन्मभूमीच्या 100 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली त्यानंतर या वादात ठिणगी पडली.
शिर्डीकरांनी साई जन्मभूमी पाथरीला विरोध केला. शिर्डी बंद केले परभणी,पाथरी तही आंदोलन झाली. देशाच्या केंद्रस्थानी पाथरी आले. तब्बल दहा दिवस वाद चालल्यानंतर मुख्यत्र्यांनी यावर तोडगा काढत तात्काळ निधी देण्याचे जाहीर केले आणि वाद मिटला. हा आरखडा 100 कोटींवरून 149 कोटींवर आला. तब्बल तीन वर्ष झाले तरीही निधी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी थेट विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातच उपोषण केले आहे.
साई बाबांच्या जन्मभूमीवरून वाद झाला. या वादातून देशासमोर पाथरी शहर आले. साई बाबांचे घर, त्यांची मंदिर, मूर्ती इतर बाबी जगासमोर आल्याने येथे मोठी वर्दळ वाढली आहे. परंतु साई बाबांचे मंदिर हे शहराच्या मध्यभागी असल्याने अरुंद रस्त्यांमुळे मंदिरापर्यंत भक्तांना जाता येत नाही. पार्किंगची व्यवस्था, प्रसादालय, भक्त निवासाची सुविधा नाही. विविध सांस्कृतिक कार्यक्रम,उत्सव साजरे करण्यासाठीच्या सभागृहाची वानवा, प्रसाधनगृह नाही अशा एक ना अनेक समस्या याठिकाणी आहेत. ज्याचा फटका भक्तांना बसतोय आणि साहजिकच येथील व्यापारावर देखील त्यांचा परिणाम झाला आहे.
साई बाबा तीर्थक्षेत्र आरखडा आणि किती टप्पे याचे असणार?
- फेज 1- 96 कोटी 1 लाख 13 हजार 897 रुपये
- फेज 2 -52 कोटी 98 लाख 91 हजार 239 रुपये
- एकूण आराखडा 149 कोटी 5136 रुपये दोन टप्प्यात
या आराखड्यानुसार नेमके काय विकास कामे होणार?
- मंदिर परिसरातील जमिनीचे अधिग्रहण व तेथील रहिवाशांचे पुनर्वसन
- मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, नाल्या, पथदिवे, दिशादर्शक फलक
- मुख्य प्रवेशद्वार, दर्शनवारी हॉल, फुल, प्रसादाची बाजारपेठ, प्रसाधन गृह
- भव्य दिव्य भक्त निवास, प्रशस्त प्रसादालाय आणि इतर विकास कामे
या आराखड्याच्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन झाली याच समितीच्या,साईबाबा जन्मभूमीचे विश्वस्त, जिल्हयातील अधिकारी यांच्या सोबत अनेक बैठका झाल्या. प्रत्येक वेळी परभणीकरांना अशा होती की विकास आराखडा मंजूर होऊन निधी मिळेल मात्र तसे झाले नाही आणि पाथरी बरोबरच जिल्हावासियांचा पुन्हा वारंवार हिरमोड झाला.