Parbhani Crime Update:  परभणीतील मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील (MNS Sachin Patil Murder Case) यांच्या हत्याप्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमी खेळताना तू मोठा की मी मोठा यावरून सचिन पाटील आणि त्यांचा मित्र विजय जाधव यांच्यात वाद झाला. याच वादातून विजय जाधव याने सचिन पाटील यांची चाकूने वार करून हत्या केल्याची फिर्याद मयत सचिन पाटील यांचे भाऊ संदीप पाटील यांनी पोलिसांत दिली आहे. संदीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार विजय जाधव याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मनसे देखील आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची सखल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.


परभणी शहरातील शिवराम नगर येथील गिरीश रेवले यांच्या घरी कुणीही नसल्याने मयत सचिन पाटील, आरोपी विजय जाधव यांच्यासह काही मित्र रमी खेळत होते. यावेळी रात्री उशिरा विजय जाधव आणि सचिन पाटील यांच्यात तू मोठा की मी मोठा असे म्हणत वाद झाला, हाच वाद विकोपाला गेला आणि विजय जाधव याने त्याच्या गाडीतील चाकू काढून सचिन पाटील यांच्या मानेवर, पाठीवर वार केले. त्यावेळी इतर मित्रांनी आणि सचिन पाटील यांचे मोठे भाऊ संदीप पाटील यांनी सचिन पाटील यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सचिन पाटील हे मृत्यूमूखी पडले होते.


यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्ट मॉर्टम करून सायंकाळी त्यांचा मृतदेह घरी नेण्यात आला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात सायंकाळी 5 वाजता सचिन पाटील यांचे मोठे भाऊ संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय जाधव याच्यावर शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सचिन पाटील यांच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे नेते दिलीप धोत्रे हे परभणीत दाखल झाले असून त्यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 



परवाच गंगाखेड येथे मनसेच्या शाखेचं उद्घाटन 


मृत्यूच्या आदल्या दिवशीच मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत गंगाखेड तालुक्यातील मुळी येथे मनसेची शाखा स्थापन केली होती.  या शाखेचं उद्घाटन दणक्यात करण्यात आलं होतं.  उद्घाटन झाल्यानंतर ही घटना घडल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :