Parbhani Highway News Updates : परभणीच्या कोल्हा ते नुसरतपुर राष्ट्रीय महामार्ग 222 चे काम तब्बल 5 वर्षापासून सुरु आहे. जे अजुनही पूर्ण झालेले नाही. वांरवार बैठका घेऊनही त्यावर काही केलं जात नसल्याने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी थेट राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियत्यांना चांगलाच दणका दिला आहे. येत्या 7 जूनपर्यंत हे काम पूर्ण नाही केले आणि इथे अपघात झाला अथवा इतर काही नुकसान झाले तर त्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. 


2017 सालापासून परभणीच्या कोल्हा ते नुसरतपूर या राष्ट्रीय महामार्ग 222 चे काम सुरु झाले आहे.  यात मुख्य कंत्राटदार GDCL कंपनीने 4 सब कंपन्यांना हे काम दिले. मात्र चारही कंपन्यांनी हे काम पूर्ण न करता कुठे अर्धवट खोदून ठेवले आहे तर अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. तसेच पुलांचे कामही पूर्ण झालेलं नाही. 
 
218 पेक्षा जास्त अपघातात 113 पेक्षा जास्त नागरिकांनी जीव गमावला


या रस्त्याच्या याच अर्धवट झालेल्या कामांमुळे 2017 ते 21 दरम्यान 218 पेक्षा जास्त अपघातात 113 पेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आलं आहे. याच अनुषंगाने एबीपी माझाने याबाबत पाठपुरावा सुरु केल्यांनतर मुख्य कंत्राटदार कंपनी GDCL ला टर्मिनेट करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी साडे चार कोटी खर्चून खड्डे बुजवणे व लेअर टाकणे अशी मलमपट्टी केली जात आहे.


ज्यावर परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यात त्यांनी कार्यकारी अभियंता एस एस सहूत्रे यांना चांगलीच तंबी दिली.  वारंवार याबाबत बैठका घेऊन, तोंडी सांगून, पत्र देऊनही काम पूर्ण केलं जात नाही. जर येत्या 7 जूनपर्यंत जर हे काम पूर्ण नाही झाले आणि या मार्गावर सामान्यांचा अपघात झाला किंवा इतर नुकसान झाले त्याची जबाबदारी तुमच्यावर निश्चित करून थेट गुन्हे दाखल करु, असा इशारा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या: