बीड : राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. परळी पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन यावेळी निमित्त ठरलं आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी या इमारतीचं परस्पर उद्घाटन केल्याने पंकजा मुंडेनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला.
साडेचार कोटी खर्चून करुन बांधण्यात आलेल्या परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस आधीच या इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी परळी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
"परळी पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना नियमबाह्य पद्धतीन इमारतीचे उद्घाटन काही टवाळांकडून केले. टवाळखोरांनी केलेले उद्घाटन हा तर निव्वळ बालिशपणा आहे. राजकारणात असे कृत्य अशोभनीय आहे. केवळ परळीत नाही तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारतीला मी निधी दिला, यात कोणताही भेदभाव केला नाही. परळीची पंचायत समिती भाजपच्या ताब्यात असताना निधी मंजूर केला. नंतर ही पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. मात्र मी काम रखडविले नाही. मला जनतेसाठी काम करायचं आहे, श्रेयासाठी नाही", असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला.
"विकास कामांमध्ये खेकडा प्रवृत्तीने काम करणाऱ्या लोकांना भविष्यात मी केलेल्या कामांचं रात्रीतच उद्घाटन करण्याची नामुष्की येईल", अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.
"राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना परळी मतदारसंघासाठी एकही इमारत अथवा रस्ता मंजूर करू न शकणारे लोक माझ्या खात्यामार्फत मंजूर झालेल्या कामाचे रात्रीत उद्घाटन करत आहेत. अशा लोकांना सत्ता असताना एकाही कोनशिलेवर स्वतःचे नाव का लावता आले नाही", असा सवाल पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना नाव न घेता विचारला.