शिर्डी : लघुशंका आणि कचऱ्याच्या किरकोळ कारणावरुन एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. शिर्डीतील निमगाव परीसरात राहणाऱ्या ठाकूर कुटुंबावर शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने घाला घातला. पोलिसांनी आरोपी अर्जुन पन्हाळेला बेड्या ठोकल्या आहेत.


शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांवर शेजारीच राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे याने धारदार कोयत्याने हल्ला केला. लघुशंका व कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणातून अर्जुन पन्हाळेने तिघांची हत्या केली.


आरोपी पन्हाळेने पाच जणांवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये 62 वर्षीय नामदेव उर्फ दादा ठाकूर, 50 वर्षीय दगडूबाई आणि 16 वर्षीय खुशी ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. खुशी शाळेत जाण्यासाठी तयारी करत असताना तिची निर्दयी हत्या करण्यात आली.



राजेंद्र ठाकूर आणि तावू ठाकूर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना शिर्डीच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आरोपी अर्जून पन्हाळेला अटक केली.


ठाकूर कुटुंबीय आणि अर्जुन पन्हाळे शेजारी होते. त्यांच्यात सतत किरकोळ कारणावरून वाद होत असत. मात्र शनिवारी दारावर कुणीतरी लघुशंका केल्याच्या रागातून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि पन्हाळेने हे कृत्य केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अर्जुन पन्हाळेचा घटस्फोट झाल्याने तो एकटाच घरात राहत होता.