नवी मुंबईः हायकोर्टाच्या आदेशानुसार पनवेल आणि परिसरातील 32 गावांचा समावेश करून नवी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे. याबाबतच्या निर्णयावर आजच मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं असून सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नयना क्षेत्रातील 36 गावं मात्र महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. येत्या 15 दिवसांत याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली.

 

नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर याचा मोठा ताण पडत आहे.  त्यामुळे या भागाचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील 21 आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील 11 आणि नयना क्षेत्रातील 36 अशा 68 गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्य़ातील पहिली महापालिका स्थापन करण्याचा निर्णय सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता.

 

नगरपालिका निवडणुकीनंतर किमान वर्षभर महापालिका स्थापन करता येत नसल्याने महापालिकेची स्थापना किमान वर्षभर तरी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र हे प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर महापालिका स्थापनेसंदर्भात सरकारने आठ दिवसांत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश हायकोर्टाने गेल्याच आठवड्यात दिले होते.

 

नयनातील वगळलेली गावे

 

आदई, आकुर्ली, पालीदेवद, देवद, वीचुंबे, उसर्ली खुर्द, शिल्लोतर, रायचूर, चिपळे, बोनशेत, विहीखर, चिखले, कोन, डेरीवली, पळस्पे, कोळखे, शिवकर, कोर्पोली, केवाले, नेर, हरीग्राम, नितलास, खैराणे खुर्द, कानपोली, वलप, हेदुटने, पालेबुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोली, अंबीवली, मोहो, नांदगाव, कुडावे, वडीवली, तुरमाले, चिरवत

 

महापालिकेत समाविष्ट गावे

 

तळोजे, पानचंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचापाडा, कामोठे, चाळ, नावडे, नावडेखार, पेंधर, तोंडरे, कळंबोली, अंबेतखार, कोल्हेखार, रोडपाडा, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, आसुडगाव, खैरणे बुद्रुक, बीड, आडीवली, रोहिंजन, धानसर, पिसवे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे, मजकूर, घोट, कायनाव्हेल्हे