कोल्हापूर : कोल्हापुरात पोटच्या पोरांची हत्या करुन पित्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडे गावात रहाणाऱ्या अवबा धनगर यांनी पत्नीच्या आजारपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचललं.

 

धनगर यांनी आपल्या दोन लहान मुलांना गळफास लावून आत्महत्या केली. आवबा अण्णाप्पा धनगर हे आपल्या कुटुंबीयांसोबत शेतमजूरी करुन उदरनिर्वाह करत होते. आवबा यांना माय्याप्पा हा 10 वर्षांचा मुलगा आणि श्रावणी ही 8 वर्षांची मुलगी होती. पत्नी वारंवार आजारी पडत असल्यानं तिला त्यांनी माहेरी पाठवलं होतं.

 
दुपारी अवबा यांचे आई-वडील शेतात कामासाठी गेले. त्यावेळी आवबा यांनी माय्याप्पा आणि श्रावणी या दोघांना घरातील बाहेरील खोलीत गळफास लावून मारलं, त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. धनगर यांच्या शेजाऱ्यांनी घराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. त्यानंतर आत्महत्या केल्याचं उघड झालं.

 
अवबा धनगर यांनी पत्नी आजार असते, अशी माहिती नातेवाईक देत आहेत. मात्र त्यांनी आपल्या दोन मुलांसह कोणत्या कारणासाठी आपली जीवनयात्रा संपवली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. आवबा, मायाप्पा आणि श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदना साठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात आणण्यात आला, या वेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे अधिक चौकशी करत आहेत.