बीड : विकास कामांमध्ये आडवे याल तर बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. बीड शहरात राष्ट्रवादीचे आमदार विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आ. आण्णा काळजी करू नका, कामे पूर्ण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध होईल, असे सांगून जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारण करण्यासाठी आमच्या नेत्यांचा वापर केला जात होता. मात्र अशा लोकांचे मनसुबे आता धुळीला मिळाले आहेत. विकासकामांसाठी आ.जयदत्त आण्णा आणि नगराध्यक्षांचा सतत पाठपुरावा असतो म्हणूनच या योजना आपण मंजूर करू शकलो, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रम राष्ट्रवादीचा, निमंत्रित भाजप, क्षीरसागर बंधूंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान देत बीडमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री तर पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती म्हणून बोलावले होते. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचा  तर उपस्थिती भाजप नेत्यांची अशी चर्चाही सुरु होती.

राष्ट्रवादी कानफुक्यांचा पक्ष : सुरेश धस
यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये कान फुंकणाऱ्याचे ऐकले जाते. तो कानफुक्यांचा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये म्हणजे घरफोडी सहकारी संस्था झाली आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.

यावेळी बोलताना आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यावे, शुभारंभ करावा असा प्रयत्न सुरू असतांना आचारसंहिता आणि काही स्पीडब्रेकर आडवे आले होते. मात्र ती अडचण दूर झाली. कुठलाही राजकीय अभिनिवेश न पाहता मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी सकारात्मकता दाखविली. जो काम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमचा बीड जिल्हा उभा राहतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे, असे म्हणत बीड नगरपालिकेला केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे या भाषणादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक शब्दही उच्चारला नाही.