Pankaja Munde News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman hake) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाविषयी (obc reservation) राज्य सरकारने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र पाठवत आपली मागणी केली आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भेट देऊन त्यांचं म्हणण ऐकून घ्यावं, ही भेटही तेवढीच महत्वाची आहे, असं त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.


पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडीगोद्री येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, त्यांनी पाणी देखील बंद केले आहे. शासनाची भूमिका ही सर्व आंदोलनांनासारखीच असली पाहिजे. हाके यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यानी तसेच आपण स्वतः गांभिर्याने लक्ष तर द्यावेच याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यांचं आणि सर्व ओबीसी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे. 


"कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये" असंच आवाहन ते करत आहेत म्हणजे व्यवस्थेचा सन्मानच करत आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. इथे प्रश्न समान न्यायाचा आहे, म्हणणे ऐकून कायद्याने निर्णय  घ्यावा अशी आवश्यकता आहे. आपण व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलना विषयीची आपली भूमिका जाहीर स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी अशी आपणास माझी विनंती आहे.






लक्ष्मण हाके यांच्या पत्नी डॉ. विजयालक्ष्मी  आणि मुलगा आदित्य याची आंदोलनस्थळी भेट 


गेल्या सात दिवसापासून जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी उपोषण आंदोलन करत आहेत, आज या आंदोलन स्थळी लक्ष्मण हाके यांच्या पत्नी डॉक्टर विजयालक्ष्मी आणि मुलगा आदित्य यांनी हाके  यांची भेट घेतली, यावेळी लक्ष्मण हाके काहीशे भाऊक झाल्याचं  पाहायला मिळालं.  


यावेळी हाके यांच्या पत्नी विजयालक्ष्मी हाके यांनी मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले तरी ओबीसी गटातून का आरक्षण हवंय असा सवाल करत परिवार म्हणून मला माझ्या कुटुंबाला आणि लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांना खूप काळजी वाटत असून सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी विनंती त्यांनी केली. 


आणखी वाचा :


मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, पक्ष काढण्यावर अद्याप निर्णय नाही - मनोज जरांगे पाटील 


मोठी बातमी : मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार, 127 जागांचा सर्व्हे पूर्ण!