बीड : आपण कसल्याही पराभवाने उद्विग्न होणार नाही किंवा विजयाने उन्मत्त होणार नाही, असं वचन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं.  भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


या कार्यक्रमादरम्यान वाहन चालकांना टॅक्सी वितरण, बचतगटांना खेळते भांडवल, कर्ज वाटप, आरोग्य शिबीर , कौशल्य विकास कक्ष, तरूणांना नोकरीची संधी अशा सामाजिक उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुंडे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या कार्यक्रमाला ध्यानयोगी उत्तम स्वामी महाराज, खासदार छत्रपती संभाजी राजे, बीडच्या खासदार प्रितम मुंडे, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती होती.

मुंडे साहेबांनीच मला खासदारकी देण्याचे अभिवचन दिलं होतं : संभाजी राजे

या कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांकडून गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. छत्रपती संभाजी राजे यांनी गोपीनाथ मुंडेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. छत्रपती घराणे आणि मुंडे घराण्याचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा वंशज म्हणून नव्हे तर बहुजन समाजाचा चांगला युवक म्हणून मला मुंडे साहेबांनी जवळ केलं, असं संभाजी राजे म्हणाले.

एवढच नाही तर आपल्याला खासदारकी देण्याचं अभिवचनही गोपीनाथ मुंडेंनीच दिलं होतं, असंही संभाजी राजे यांनी सांगितलं.