मुंबई: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे गेली सात वर्ष दुरावल्याची खंत आज व्यक्त केली. 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंकजा मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर रक्षाबंधनासाठी आले होते. गेल्या चार ते पाच वर्षापासून पंकजा मुंडे त्यांना राखी बांधतात. त्यावेळी पंकजा मुंडेंनी एबीपी माझाशी बोलताना आजच्या दिवशी धनंजय मुंडेची आठवण येत असल्याचं सांगितलं.
'राजकारण किंवा व्यवसायात एका ठराविक उंचीवर गेल्यावर कुटुंबातील सदस्य दुरावतात. पण मी कधीही धनंजयला त्रास होईल असं वागलेली नाही आणि वागणारही नाही.' असं म्हणत धनंजय मुंडे दुरावल्याची खंत पंकजांनी व्यक्त केली.
'सात वर्षे झाली मी आणि धनंजय मुंडे दुरावले त्याला. आमचं नातं खूप मैत्रीपूर्ण होतं. पण, आता त्याची सवय झाली. तरीही आजच्या दिवशी आठवण येतेच. माझ्या दुरावलेल्या भावालाही माझ्या सदिच्छाच आहे.' असं म्हणत पंकजांनी रक्षाबंधनाच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.