बीड : वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बीडच्या मानूरमधील मठाला पाच वर्षांनंतर नवे मठाधिपती मिळाले आहेत. अवघ्या 19 वर्षांच्या नागेश विश्वनाथ पुराणिक यांनी हजारो शिवभक्तांच्या साक्षीनं मठाचे उत्तराधिकारी म्हणून सूत्रं हाती घेतली आहेत.

 
गुरु गिरी शिवाचार्य मानूरकर असं त्याचं नामकरणही करण्यात आलं. बुधवारी पहाटे 6 वाजता मानूर देवस्थानात पट्टाभिषेकास सुरुवात झाली. त्यानंतर नागेश पुराणिक यांची 'जय शिवा, हर हर महादेव'च्या जयघोषात गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

 
पट्टाभिषेकाचा विधी उरकल्यानंतर मंदिर परिसरातच शंखनादानं धर्मसभेला सुरुवात झाली. पाच वर्षांपूर्वी विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचं देहावसान झाल्यानंतर त्यांचे शिष्य गुरुगिरी शिवाचार्य यांना संस्थानच्या गादीवर बसवण्यात आलं.

 
26 सप्टेंबर 2011 रोजी गुरुगिरी महाराजांचं आजारानं निधन झालं. यानंतर गावकरी आणि भक्तांमध्ये बेबनाव झाला. महाराजांना समाधीही मठाबाहेरच देण्यात आली. भक्तांनी गुरुगिरी महाराजांचा भाचा नागेश पुराणिक यांना उत्तराधिकारी नेमण्याचा आग्रह धरला होता. याला गावकऱ्यांचा विरोध होता.