बीड : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना पंचनामे करुन लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल असं आश्वासनही दिलं.
पंकजा मुंडेंनी यावेळी बीड शहर आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. बिंदुसरा धरण पूर्ण भरल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे धरणक्षेत्रातील शेती पाण्याखाली गेली आहे. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या भागाचा दौरा करुन पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
गेल्या काही दिवसात मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठिशी आहे, तसंच पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतीचे पंचनामे करुन लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल असंही पंकजा मुंडेंनी दौऱ्यावेळी सांगितल.