मुंबईः महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा दौऱ्याआधी जमाव बंदी लावण्यात आली आहे. मात्र पंकजा मुंडेंनी या जमावबंदीला विरोध केलाय. मी लोकांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे जमावबंदी लावू नये, अशी विनंती पंकजा मुंडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
पंकजा मुंडे उद्या पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणग्रस्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत. आपण एक स्त्री मंत्री आहोत, त्यामुळे आईच्या भावना आणि लोकांचा आक्रोश समजू शकतो. श्रमजीवी संघटनेशी बोलून चर्चा करु. मात्र या प्रकरणात राजकारण होत असेल तर ते थांबलं पाहिजे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
कुपोषणाबाबत बैठक घेतली असून दोन वर्षांसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. आदिवासी जिल्ह्यात सकस आहार कसा पोहचवता येईल, त्याबाबत चर्चा झाली असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
मोखाड्यातल्या सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला. एवढंच नाही तर कुपोषण आणि इतर कारणांमुळे पालघर जिल्ह्यात 600 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी गेले होते. मात्र मृत बालकाच्या आईने सावरा यांना दारातून परतून लावलं.