धुळे : धुळ्यात पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हक्काच्या पाण्याची विचारणा करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला.

धुळे जिल्ह्यातील सिंधखेडा तालुक्यात उणापुरा 50 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे आख्खा हंगाम वाया गेला. प्यायला पाणी नाही, याची तक्रार करुनही सरकार दाद देत नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलयाला घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडीही अडवली. मात्र पाणी मागायला आलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचं सौजन्य जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलं नाही.

त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत.

यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी 100 हून जास्त आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

दरम्यान, सिंदखेडा तालुक्यातील खंडाला, भदाणे, मेहरगावसह 10 गावात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे. तसंच पाऊस नसल्याने चाऱ्याची कमतरता आहे, त्यामुळे छावण्या सुरु कराव्या आणि पिकांची 50 टक्क्यापेक्षा कमी आणेवारी जाहीर करावी अशी मागणी आहे.