बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात धडाडू लागलेल्या प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील परळीमध्ये आज त्यांची शेवटची सभा घेतली. परंतु या सभेत भाषण केल्यानंतर स्टेजवरच त्यांना चक्कर आली. चक्कर आल्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता.


मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसांपासून पंकजा मुंडे यांच्या राज्यभर सभा सुरु आहेत. त्यामुळे त्यांची मोठी दगदग झाली. आज त्यांनी परळीत एक भावनिक भाषण केलं. परंतु भाषणानंतर त्या चक्कर येऊन स्टेजवर कोसळल्या. यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबतच होते. चक्कर आल्यानंतर पालवे यांनी पंकजा यांना दवाखान्यात नेले आहे.

दरम्यान, या सभेवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरही तिथे उपस्थित होते. या घटनेबाबत जानकर म्हणाले की, आज सकाळपासून मी पंकजाताईंसोबत आहे. पंकजाताई गेल्या काही दिवसांपासून प्रचारात इतक्या व्यस्त आहेत की, त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. सततचा प्रवास आणि जागरणामुळे त्यांना अॅसिडिटीचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना चक्कर आली. पंकजाताईंची तब्येत आता बरी आहे. त्या तंदुरुस्त आहेत.

व्हिडीओ पाहा