उस्मानाबाद : रमेश कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या उस्मानाबादमध्ये सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होत्या.


“रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांस आव्हान देणारे धस यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फटका सोसावा लागणार आहे. कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही”, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपातर्फे सुरेश धस यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवारी सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी पवार नव्हे दलाल चालवतात

 “राष्ट्रवादी पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही. आता पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा अजित पवार पक्ष चालवत नसून, तोडपाणी करणार्‍या दलालांच्या हातात पक्षाची सूत्रं गेली आहेत”, अशा शब्दात माजी मंत्री सुरेश धस यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली.

“गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर उभे ठाकण्याची राष्ट्रवादीमध्ये कोणातच धमक नव्हती. त्यावेळी आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. परभणीत बाबाजानी दुर्राणी यांचा बळी दिला गेला, तर उस्मानाबादेत अशोक जगदाळे यांना उमेदवार म्हणून नुसतेच फिरवले. रमेश कराड यांना उमेदवारी देण्याचा नक्की निकष काय?”, असा सवालही धस यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रमेश कराड यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली आहे.

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.