बीड : बीडमधील एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी वक्तशीरपणावरुन बंधू धनंजय यांना टोला लगावला, तर धनंजय मुंडेंनीही बहिणीला प्रत्युत्तर देण्याची संधी दवडली नाही.

परळीत गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम काल पार पडला. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिरात व्यासपीठावर पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते.

या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उशिरा आल्याचं हेरत 'मी वेळेवर येणारी विद्यार्थिनी आहे' अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी त्यांना टोला लगावला. 'मी वेळेत आले, मात्र कार्यक्रम उशिरा सुरु झाला. दुसऱ्या कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते' असं म्हणत कार्यक्रम संपण्याच्या आधीच पंकजा मुंडे निघून गेल्या.

पंकजा वेळेपूर्वी निघाल्यामुळे धनंजय मुंडेंनीही टोला लगावला. 'चांगले विद्यार्थी लवकर येतात आणि वेळेआधीच जातात, हे मला पहिल्यांदाच समजलं. शेवटी, मार्कशीटवर कोण विद्यार्थी चांगला, कोण वाईट हे ठरतं. मात्र वेळेला आम्ही कायम सोबत असतो, हे निश्चित' असं उत्तर धनंजय मुंडेंनी दिलं.

विरोधी पक्ष आधी बोलत असतो आणि त्याचे उत्तर सत्ताधारी देत असतो. मात्र इथे उलट झालं आहे. कदाचित भविष्याची त्यांना चाहूल लागली असावी, असंही पुढे धनंजय मुंडे म्हणाले.