अहमदनगर : पांगरमल दारुकांडातील फरार आरोपी राजेंद्र घुगे यांचं अपघाती निधन झालं आहे. मंगळवारी रात्री अहमदनगर-कल्याण मार्गावर ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला. मात्र हा अपघात आहे की घातपात, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.


बनावट दारु तयार करणं आणि ती पुरवण्यात राजेंद्र घुगेचा महत्वाचा सहभाग होता, असं बोललं जातं. बनावट दारु तयार करणाऱ्या याकूबला घुगे रिकाम्या बॉटल, झाकन आणि अल्कोहोलचा पुरवठा करत होता, असा आरोप आहे.

बनावट दारुमुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. यापैकी 9 जण पांगरमलचे रहिवाशी आहेत.

काय आहे प्रकरण?

निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यपानाने आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. बनावट दारु प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे.  शिवसेना उमेदवारानं दिलेल्या पार्टीमध्ये दारु प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. याप्रकरणी चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचले आहेत. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं होतं.

कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं होतं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला होता. त्यामुळे यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते. पण आता संशयितांच्या अटकेसोबतच राज्य उत्पादन शुल्कच्या 6 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :


अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातच बनावट दारुचा अड्डा


शिवसेना उमेदवाराच्या पार्टीत अतिमद्यपान, तिघांचा मृत्यू


अहमदनगर दारुकांडातील तीन फरार आरोपींना नांदेडमधून अटक