पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनाची आस ठेवून शेकडो किलोमीटर दूरवरुन लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले आहेत. या भाविकांना अखंड दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी आजपासून विठुरायाच्या 24 तास दर्शनाला सुरुवात झाली आहे. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले असून देवाचा शेजघरातील पलंग देखील काढण्यात आला आहे.
आजपासून विठुरायाचे व्हीआयपी (VIP) आणि ऑनलाईन दर्शन यात्रा संपेपर्यंत बंद करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. यामुळे आता फक्त दर्शनाच्या रांगेत तासंतास उभ्या राहणाऱ्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. आजपासून रोज जवळपास 50 ते 60 हजार भाविकांना देवाच्या पायावर दर्शन घेता येणार (पदस्पर्श करता येणार) असून रोज लाखभर लोकांना मुखदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
आज देवाच्या महानैवेद्यानंतर देवाचा शेजघरातील पलंग काढण्यात आला. त्यानंतर देवाच्या पाठीमागे कापसाचा लोड बसविण्यात आला. आजपासून विठुरायाच्या काकड्यापासून शेजारतीपर्यंतचे सर्व राजोपचार बंद होणार असून सकाळी नैवेद्य, सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार देवाला केले जाणार आहेत.
आज देवाचा आणि रुक्मिणी मातेचा पलंग काढल्यामुळे आषाढी यात्रेचा सोहळा संपेपर्यंत देव चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी उभे राहणार आहेत. सातत्याने उभा राहून देवाला थकवा जाणवू नये यासाठी देवाच्या पाठीला कापसाचा लोड बसविण्यात आला असून रुक्मिणी मातेच्या मागे कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे. यामुळे आता भाविकांना आजपासून रात्रंदिवस विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे.
आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या 24 तास दर्शनाला सुरुवात, देवाचा पलंग निघाला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2019 04:52 PM (IST)
विठुरायाच्या दर्शनाची आस ठेवून शेकडो किलोमीटर दूरवरुन लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले आहेत. या भाविकांना अखंड दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून विठुरायाच्या 24 तास दर्शनाला सुरुवात झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -