पंढरपूर : राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट होऊ दे, असंही अजित पवारांनी विठुरायाला साकडे घातले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते.


आषाढी राज्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे , कोरोनाची लस लवकर उपलब्ध होऊन जगाची यातून सुटका कर असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातले . आज पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी कवडूजी भोईर व कुसुमाबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.


सध्या राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे , शेतकरीही अडचणीत आलाय अशावेळी लवकरात लवकर कोरोनाची लस आल्यास जगाला व राज्याला दिलासा मिळेल असे अजित पवारांनी महापूजेनंतर बोलताना सांगितले. यावेळी येताना यात्रा अनुदानाचा चेक घेऊन आल्याचे सांगताना आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याने ती आता दुरुस्त केल्याचे अजित पवारांनी सांगितले. वारकऱ्यांच्या नाराजीबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न सुटला व चांगला मार्ग निघाल्याचे सांगताना वारकरी नेहमी नियम व कायद्याचे पालन करणारे असल्याची पुष्टीही अजित पवारांनी जोडली .


आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आपली पत्नी व दोन्ही मुलांसह विठ्ठल मंदिरात दाखल झाले. यानंतर चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते विठूरायाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा संपन्न झाली . यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , मंदिर समिती सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार केवळ 25 जणांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला होता.