सांगली : तासगावात वाळू तस्करांना रोखण्यास गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना 21 नोव्हेंबरला रात्री घडली. या प्रकरणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यावर दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना घडून तीन दिवस झाल्यानंतर तहसीलदारानी तक्रार दिली आहे.


बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या अंगावर पीकअप वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी दोघा वाळू तस्करांना तासगाव पोलिसांनी अटक केली. यामध्ये अनिकेत अनिल पाटील आणि गौरव तानाजी पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांनी दिली. या सिनेस्टाईल थराराची तासगाव तालुक्यात चर्चा होती.


पिसाळलेल्या कुत्र्याला मारताना आजोबाचा नेम चुकला, बंदुकीच्या गोळीने नातू जखमी


पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले की त्या 21 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता नेहरूनगर येथील कँम्प आटोपून परत येत होत्या. यावेळी त्यांना शहरातील कापूर ओढ्यात वाळू चोरी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या कापूर ओढ्यात गेल्या असता तेथे अनिकेत पाटील व गौरव पाटील हे दोघे पीकअप व्हॅन (एम एच 10, झेड 5270) मध्ये वाळू भरत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी टॉर्चच्या उजेडात सदरच्या ठिकाणी जात वाळू उपसा थांबवा असे सांगितले. यावेळी गौरव पळून गेला. तर अनिकेत पाटील हा गाडी सुरू करून गाडीसह पळून जाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच ढवळे यांनी वाट अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील याने तहसीलदार ढवळे यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारायचा प्रयत्न करत तो पळून गेला.


मुलीची छेड काढली म्हणून कॉलेज तरुणांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू


प्रसंगावधान राखून तहसीलदार ढवळे या बाजूला झाल्या म्हणून पुढील अनर्थ टळला. त्याही अवस्थेत पळून जाणाऱ्या तस्करांच्या पीकअप व्हॅनचा पाठलाग सुरू केला. वसंतदादा कॉलेज समोर होमगार्डला आवाज देत पाठलाग करण्यास सांगितले. या पाठलागास यश येत तासगाव सांगली रस्त्यावर एका कोल्ड स्टोअरेज समोर गाडी अडवण्यात आली. आपण सापडणार हे लक्षात येताच अनिकेत गाडी सोडून पळून गेला. होमगार्डने गाडी तहसील कार्यालयात लावली असून अनिकेत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तहसीलदार ढवळे यांनी तासगाव पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी अनिकेत पाटील व गौरव पाटील या दोघांना अटक केली आहे.