पंढरपूर: आज होत असलेल्या वर्षातील शेवटच्या खंडग्रास सूर्यग्रहणामुळे (Solar Eclipse) विठुरायाच्या रोजच्या नित्योपचारात मोठा बदल होणार असला तरी भाविकांना मात्र ग्रहणकाळात देखील विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. आज दुपारी ग्रहण सुरु झाल्यापासून देवाच्या नित्योपचार पुढे गेले आहेत. आज पहाटे साडेतीन वाजता ग्रहणाचे वेध लागले असून पहाटे ठरलेल्या वेळेनुसार देवाचा काकडा करण्यात आला. यानंतर पावणे अकरा वाजता दाखविण्यात येणाऱ्या महानैवेद्यात अन्नमय पदार्थ न दाखवता सुकामेवा आणि फळफळावळ याचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.

Continues below advertisement

 सूर्य ग्रहणामुळे सूर्याचे शुद्ध सूर्यबिंब आज अन्नावर पडत नसल्याने अन्नमय पदार्थाचा नैवेद्य विठुरायाला देण्यात येणार नाही. दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी ग्रहण सुरु होताच मंदिराचे पुजारी चंद्रभागेत स्नान करून ओल्याने चंद्रभागेचे कळशीभर पाणी देवाच्या स्नानदातही आणतील. यानंतर पुरुषसुक्त म्हणून विठुरायाला स्नान घातले जाणार आहे. आज पोषाखाच्यावेळी नेमकी ग्रहणाला सुरुवात होत असल्याने पोशाख हा ग्रहण संपल्यावर होणार आहे. 

ग्रहण काळात भाविकांचे दर्शन सुरु राहणार असून रुक्मिणी मातेकडे देखील याच पद्धतीने चंद्रभागेच्या पाण्याने ग्रहण सुरु होताच स्त्रीसुक्तच्या मंत्रोपचारात स्नान घातले जाणार आहे. ग्रहण 6 वाजून 30 मिनिटांनी संपल्यावर पुन्हा पुजारी चंद्रभागेवर जाऊन येथील पाण्याने विठ्ठल रुक्मिणीला स्नान घालेल. यानंतर देवाचा पोशाख होणार असून आज ग्रहांमुळे विठ्ठल रुक्मिणीला दागिन्यांनी सजविण्यात येणार नाही . पोशाखानंतर देवाला लाडू ऐवजी दुधाचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. 

Continues below advertisement

या ग्रहणाची कर उद्या सूर्योदयापर्यंत असल्याने देवाला महानैवेद्यात देखील सुकामेवा , फळे आणि दूध दाखविले जाणार आहे. संध्याकाळी धुपारती आणि रात्री शेजारातीनंतर देव निद्रेला जाईल आणि उद्या सकाळी म्हणजे पाडव्याला काकड्यापासून विठुरायाचे सर्व नित्योपचार नियमित सुरु होतील अशी माहिती मंदिराचे गुरु समीर कौलगी यांनी दिली . या संपूर्ण खंडग्रास सूर्यग्रहण काळात भाविकांच्या दर्शनात मात्र कोणताही बदल केला नसल्याने देशभरात आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.