ग्रामीण भागात शिक्षण झाल्यानंतर सांगली इथल्या वालचंद कॉलेजमधून बीटेकची पदवी घेतल्यावर त्याने लठ्ठ पगाराची नोकरीही मिळवली. मात्र शिक्षणाची ओढ शांत बसू देत नसल्याने त्याने मद्रास IIT साठी तयारी सुरु केली. नोकरी करत त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि दरम्यान DRDOची जाहिरात पाहण्यात आल्यावर त्याने यासाठीही अर्ज दाखल केला. देशातील दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत असताना धनंजयने देशात पहिला नंबर मिळवत सैन्यदलात शास्त्रज्ञ बनला.
पळशी गावात धनंजय हा एकत्रित शेतकरी कुटुंबात वाढला. घरातील पहिला उच्च शिक्षण घेणारा तरुण म्हणून सगळेच कुटुंबीय त्याला शिक्षणाला प्रोत्साहन देत होते. ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीची भीती वाटत असली तरी त्यांच्याच आत्मविश्वास आणि कष्ट करायची तयारी जास्त असते, असं धनंजय सांगतो. एखाद्या विषयाची डिग्री घेतल्यानंतर त्यातच पुढे शिक्षण घेणं चांगलं असताना अनेक तरुण स्पर्धा परीक्षांच्या मागे धावतात. मात्र मूळ ज्या विषयात शिक्षण घेतले त्यातच तुम्ही अभ्यास करत राहिल्यास अनेक चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे धनंजय सांगतो.
इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यातच आवड असल्याने IIT साठी प्रयत्न करत होतो आणि त्यात प्रवेशही मिळाला. पण याचवेळी सैन्यदलातील या संधीला आत्मविश्वासाने समोर गेलो. देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी घेतलेल्या मुलाखतीत नुसता उत्तीर्ण नाही तर देशात पहिला आलो. आता भारतीय सैन्यदलातील शस्त्रे आणि इतर मिसाईल कार्यक्रम विकसित करण्याची इच्छा असून याबाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास धनंजयने व्यक्त केला आहे.
निवड झाल्यानंतर धनंजय पहिल्यांदाच आपल्या गावात पोहोचल्याने त्याच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. धनंजय नेमका काय झाला हे समजत नसलं तरी तो सैन्यात मोठा साहेब झाल्याची गावकऱ्यांची भावना आहे. सध्या गावभर त्याचे सत्कार सुरु आहेत. धनंजयला मिळालेले यश पाहून गावातील इतर मुलांनी प्रेरणा घ्यावी अशीच ग्रामस्थांची इच्छा आहे.
चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्याच्या वडिलांना सैन्यात जायचं होतं, पण निवड होऊ शकली नव्हती. आता मात्र धनंजयच्या रुपाने त्यांना आपणच भारतीय सैन्यात दाखल झाल्याचा आनंद त्यांना झाला आहे. इंजिनिअर झाल्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धनंजय भारतीय सैन्यात शास्त्रज्ञ बनला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी असलेल्या त्याच्या वडिलांनी धनंजयच्या यशात आपली स्वप्नपूर्ती पहिली.