लातूर : गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर फुलं, गुलाल यांसह अनेक गोष्टींमुळे अस्वच्छता निर्माण होते. हे लक्षात घेऊन लातुरातील औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं. विसर्जनासाठी शेवटचा मान असलेल्या लातुरातील या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्ग स्वच्छ करुन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ गेली पाच वर्षे हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे.
गणेशोत्सव उत्सवाचा अन् उत्साहाचा सण असला, तरी या माध्यमातूनही अनेकजण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतात. कुणी मदत करत असतो, तर कुणी स्वत: सक्रीयपणे काम करत असतो. लातुरातील औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने सक्रीयपणे काम करुन, आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
लातूर शहरातील शेवटचा मानाचा गणपती असलेल्या औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला रात्री 10 वाजता मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य असंय की, सर्वात उशिरा येथील विसर्जन मिरवणूक सुरुवात होते. मंडळाचे हे 48 वं वर्ष आहे. दक्षिणेकडे तोंड करुन असलेल्या या गणपतीला ‘दक्षिणेश्वर गणेश’ या नावाने ओळखले जाते. या वेगळेपणाला शोभेल असे काम मंडळाने गेल्या पाच वर्षापासून हाती घेतले आहे.
विसर्जनादिवशी मिरवणुकीदरम्यान मंडळाचे सर्व सदस्य हे स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्ग चकाचक करतात. यासाठी मंडळाचे पदाधिकारी हे स्वत: मार्ग स्वच्छ करतात. त्याच्यापूर्वी झालेल्या विसर्जन मिरवणुकीतील सर्व कचरा हे मंडळ गोळा त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावतात. त्यानंतरच त्याच्या गणेशाचे विसर्जन मिरवणूक मार्गस्थ होते. दक्षिणेश्वर गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानंतरही इतर वेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
आधी रस्त्याची स्वच्छता, मग मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा उपक्रम
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
24 Sep 2018 10:00 AM (IST)
गणपती बाप्पा उत्सवाचा अन् उत्साहाचा सण असला, तरी या माध्यमातूनही अनेकजण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतात. कुणी मदत करत असतो, तर कुणी स्वत: सक्रीयपणे काम करत असतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -