पंढरपूर : बारावीची परीक्षा देऊन घरी परत जाताना अपहरण झालेल्या तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी पाच आरोपी आणि अपहरणासाठी वापरलेली बोलेरो जीप आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला आहे.


संबंधित तरुणी पेपर सुटल्यानंतर पालकांसोबत दुचाकीवरुन घरी निघाली होती. मात्र यावेळी एक जीप आणि दुचाकी त्यांच्यापुढे येऊन थांबली. दोन आरोपी खाली उतरले. इतर आरोपींच्या मदतीने त्यांनी तरुणीला जबरदस्तीने जीपमध्ये बसवलं आणि तिथून पळ काढला. यानंतर नातेवाईकाने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.



पोलिसांना तरुणीचं सातारा भागातील मोबाईल लोकेशन सापडलं. त्याठिकाणी त्वरित पथकं रवाना केली. पोलिसांना गस्तीदरम्यान संशयास्पद बोलेरो दिसली. आरोपी तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

आरोपी सुधाकर साळुंखे हा या मुलीचा आतेभाऊ असून त्याला या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र मुलगी आणि कुटुंबीयांचा याला विरोध असल्याने त्याने आपल्या चार मित्रांच्या मदतीने तिचं अपहरण करुन लग्न करण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हालचाल करुन या पाच आरोपींना अटक करुन मुलीची सुटका केली.

या सर्व प्रकारामुळे बोर्डाच्या परीक्षेत असलेल्या ग्रामीण भागातील मुलीत दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी आता परीक्षा केंद्र आणि ग्रामीण भागात गस्त वाढवली आहे .