पुणे : प्रेयसीचा खून करुन प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडली आहे. सोनाली भिंगार दिवे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून ती मागील चार ते पाच दिवसांपूर्वी बेपत्ता होती. सोनाली इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. नऱ्हेमधील झील कॉलेजमध्ये ती शिकत होती. सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती.



सोमेश घोडकेने काही दिवसांपूर्वी कॉलेजजवळच भाड्याने खोली घेतली होती. इथे तो आणि सोनाली एकत्र राहत होते. परंतु सोनालीचे इतर मुलाशी संबंध असल्याच्या संशयातून सोमेशने सोनालीचा गळा आवळून तिची हत्या केला. तिच्या मृत्यूनंतर सोमेशने चिठ्ठी लिहून ठेवली. मी देखील आत्महत्या करणार आहे, असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. तेव्हापासून तो फरार आहे. हे दोघेही मूळचे साताऱ्याचे आहेत.

मृतदेह कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. यानंतर सिंहगड रोड पोलिस घटनास्थळी दाखल झाली. तिची हत्या साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.