Pandharpur : चैत्री यात्रेसाठी (Chaitri Yatra) राज्यभरातील भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. बहुतांश भाविक चंद्रभागेत (Chandrabhaga) स्नान केल्याशिवाय देवाच्या दर्शनाला जात नाहीत. मात्र, या भाविकांच्या जीवाला होणारा धोका टाळण्यासाठी चैत्री यात्रा कालावधीत चंद्रभागेत जीवरक्षक पथके गरजेची आहेत. प्रशासनाने तातडीनं याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उजनी धरणातून चंद्रभागेत सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग
चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळं जीवघेणे खड्डे झाले आहेत. यामुळं चंद्रभागेत स्नानाला येणाऱ्या भाविकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळं प्रशासनानं चंद्रभागा पात्रात जीवरक्षक पथके तातडीनं नियुक्त करण्याची मागणी होत आहे. सध्या सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी सध्या उजनी धरणातून चंद्रभागेमध्ये सहा हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. यामुळं चंद्रभागा दुथडी भरुन वाहत असून, हजारोंच्या संख्येने भाविक चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी गर्दी करत आहेत.
चैत्री वारीसाठी पाच ते सहा लाख भाविक येणार
प्रशासनाला अवैध वाळू उपसा रोखायचा नसला तरी किमान भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागेवर जीवरक्षक पथके तैनात केल्यास भाविकांना जीव गमवावा लागणार नाही. दोन दिवसापूर्वी चंद्रभागेमध्ये बुडालेल्या तीन भाविकांपैकी एकाच मृतदेह आज 21 तासानंतर सापडला आहे. चैत्री यात्रेसाठी आजपासून रविवारपर्यंत पाच ते सहा लाख भाविक चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येणार आहेत. प्रशासन मात्र अजूनही जीवरक्षक पथकांबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
चार मुख्य यात्रा (वाऱ्या)
1) चैत्री यात्रा
दरवर्षी पंढरपुरात मुख्य चार वाऱ्या असतात. यातील पहिली वारी ही चैत्री यात्रा असते. चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.
2) आषाढी यात्रा
आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.
3) कार्तिकी यात्रा
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
4) माघी यात्रा
माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.
महत्त्वाच्या बातम्या: