Vitthal Sahkari Sakhar Karkhana Election : पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24 तासापासून मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सध्याच्या स्थितीत नवखे अभिजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा मनाला जात आहे. पंढरपूरचे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून या कारखान्याच्या सत्तेकडे पहिले जाते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या मतदानाचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे चित्र असून विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल पिछाडीवर गेले आहे. अद्याप संपूर्ण निकाल हाती येणं बाकी असलं तरी अभिजीत पाटील यांच्या पॅनलनं मोठी बाजी मारली असल्याचं आतापर्यंतच्या कलामधून स्पष्ट झालं आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच युवराज पाटील यांनीही आपले पॅनल उभे केले होते. मात्र आत्तापर्यंतच्या मतमोजणीत विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके यांचे पॅनल तिसऱ्या स्थानावर असून अभिजित पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. अतिशय तरुण नेता म्हणून अभिजित पाटील यांना पसंती देताना त्यांच्या ताब्यात असणाऱ्या इतर चार साखर कारखान्यामुळे विठ्ठलाच्या मतदारांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
पाटील यांनी 20 वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन केवळ 35 दिवसात तो सुरु केला होता. यामुळेच गेल्या 2 वर्षांपासून बंद पडलेल्या विठ्ठल कारखान्यासाठी सभासदांनी अभिजित पाटील यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. या पराभवाचा फटका राष्ट्रवादी आणि भगिरथ भालके याना बसणार असला तरी मतमोजणी प्रक्रियेवर दुसरे पॅनल प्रमुख युवराज पाटील यांनी आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.
साडे सहाशे कोटी देणी असणाऱ्या असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळविण्यासाठी चढाओढ
पंढरपूरचे वैभव म्हणून ओळख असणाऱ्या आणि सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेत्यात चढाओढ सुरु आहे. विठ्ठल कारखान्यावर सध्या भगिरथ भालके गटाची सत्ता आहे. मात्र एका गाळपाचे बिल देऊ न शकल्याने तसेच कामगार आणि ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्याने सत्ताधारी भालके गट बॅकफूटवर आहे. अशात आर्थिक अडचणींमुळे आणि कोट्यवधींचे कर्जे झाल्याने हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. यामुळे सध्या लागलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत हा कारखाना जिंकण्यासाठी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कंबर कसली होती. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात 4 कारखाने आहेत.