पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लाखो विठ्ठल भक्तांच्या पालखी मार्ग उद्घाटन सोहळ्यात अनेक विकासकामे करणार असल्याची घोषणा केली.  त्यानंतर आता वाखरी (Wakhri) ते विठ्ठल मंदिर हा 150 कोटी रुपयांचा प्रकल्प चक्क राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार आहे. वाखरी येथे आषाढी यात्रा काळात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोन मोठे पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी थांबत असतात. येथून जवळपास 10 लाखांचा जनसागर आषाढी सोहळ्यासाठी पायी चालत येत असतो.  यामुळेच वाखरी ते श्री विठ्ठल मंदिरापर्यंत जवळपास 8.4 कलोमीटर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग करणार आहे. थेट शहरात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग विभाग काम करत असून 8.4 किलोमीटरचा चार पदरी रस्ता, दुपदरी  उड्डाण पूल , भुयारी मार्ग अशा विविध सुविधा असणारे  सिमेंटचे रस्ते तयार होणार आहे. यासाठी  150 कोटी रुपये मंजूर केले असून शहरातून राष्ट्रीय महामार्ग आणण्याचे पहिलाच प्रकल्प पंढरपूरसाठी केले जात असल्याचा दावा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे.


तीर्थक्षेत्र पंढरपूर हे सर्व बाजूंनी राष्ट्रीय महामार्गला जोडण्याची कामे सध्या अंतिम टप्प्यात असून याशिवाय 50 हजार कोटीच्या पालखी मार्गांची कामेही पूर्ण होत आली आहेत. सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथे एकत्र येऊन  पुढे पंढरपूरला जातात त्या ठिकाणचा काही रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते.  यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे या बाबत प्रस्ताव दिला होता. मात्र शहरांतर्गत रस्ते करता येणार नाही म्हणून हा प्रस्ताव रद्द झाला. सहा महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंढरपूर येथे आले असता त्याना हा प्रस्ताव सादर केल्यावर त्यांनी तात्काळ हा प्रकल्प मंजूर केला होता .  


 यामध्ये विभागणी करून काही रस्ता हा चौपदरी होणार आहे. तर एमआयटी महाविद्यालय ते अर्बन बँक  या सात किलोमीटरच्या रस्त्यामध्ये छोटे दोन पूल, भुयारी मार्ग, उड्डाण पूल असा चौपदरी होणार आहे. तेथून पुढे म्हणजेच अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता दुपदरी होणार आहे. सध्या जेवढा रस्ता आहे. तसाच पण सिमेंटचा रस्ता होणार आहे. या प्रकल्पात कोठेही भूसंपादन केले जाणार नसून गरज भासल्यास शासकीय आणि नगरपालिकांच्या जागा वापरल्या जाणार आहेत . या कामी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच निविदा प्रक्रियेला सुरवात होईल अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली .