पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचे सर्व फंडे वापरायला सुरुवात झाली आहे. भल्याभल्या वक्त्यांपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भाषणाला मतदार डोक्यावर घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रचारसभांमध्ये सत्ता बदलाबाबत वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना आनंद शिंदे म्हणाले की, "हे पवार साहेबांचं सरकार आहे, तुमच्या बापालाही पडणार नाही."
गायक आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आता प्रचारात उतरवले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी त्यांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत आणि गाण्यात प्रचाराचे काव्य गुंफून आनंद शिंदे यांनी धडाका उडवून दिला आहे. त्यांच्यासोबत अमोल मिटकरी, रोहित पवार यांच्यासारखे वक्ते असूनही नागरिकांमध्ये आनंद शिंदे यांची निवडणूक गाणी लोकप्रिय होत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता बदलाच्या दिलेल्या संकेताला आनंद शिंदे आपल्या गाण्यातून उत्तर देत आहेत.
तुम्ही चिडवताय, आम्ही चिडणार नाय,
तुम्ही लय काय करताय, तसं काय घडणार नाय,
तुम्ही रडवताय, पण आम्ही रडणार नाय
हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय
आनंद शिंदे यांच्या या गाण्यांना कार्यकर्ते डोक्यावर घेत आहेत.
मी अपीअर घेतल्याशिवाय कोठेही बाहेर जात नाही हे महाराष्ट्राला माहित आहे. पण भारत भालके हे गाववाले म्हणून माझ्या हृदयात होते आणि म्हणूनच मी त्यांचा मुलगा भागीरथसाठी प्रचारात उतरल्याचे आनंद शिंदे सांगतात.