मोदी म्हणाले की, काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. पण काँग्रेसने त्यांना पक्षामधून बाहेर काढले. तरिही पवार आज पुन्हा त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, याची खंत वाटते.
दरम्यान काँग्रेस हा केवळ एका कुटुंबाचा पक्ष आहे, असे म्हणत मोदी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त झालेल्या प्रियांका गांधी यांचे नाव न घेता टीका केली आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) आमदार राहुल कुल उपस्थित होते. कुल यांची उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. एकिकडे भाजपला बारामतीत राष्ट्रवादीच्या विरोधात तगडा उमेदवार मिळत नाही. त्यातच आता भाजपच्या कार्यक्रमात कुल यांच्या उपस्थितीमुळे त्यांना बारामतीतून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुल नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतु मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत रासपकडून उमेदवारी मिळवून विजय मिळविला होता.