लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील विविध समित्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. खासदार कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीची धुरा सोपवली आहे. प्रसिद्धीची जबाबदारी रत्नाकर महाजन यांच्याकडे तर लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना समन्वय समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती
काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. फेब्रुवारी महिन्यात प्रियांका गांधी पदभार स्वीकारणार आहेत. प्रियांका गांधींच्या एन्ट्रीमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद नव्हतं. त्यानंतर, गेल्या काही वर्षांपासून प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.
प्रियांका गांधींविषयी माहित नसलेल्या दहा गोष्टी
मागील अनेक वर्षांपासून प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत होते. ती मागणी पूर्ण झाली आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातच मर्यादित होत्या. त्या केवळ आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारात दिसत होत्या. मात्र आता त्या अधिकृतरित्या पक्षात सक्रीय होणार आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे आणि त्यात उत्तर प्रदेशची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र येत, काँग्रेसला आघाडीतून बाहेर ठेवल्याने सगळं समीकरण बदललं आहे.
संबंधित बातम्या