बीड : नाव शुभकल्याण आहे, मात्र या बँकेने बीड जिल्ह्यातील हातावर पोट भरवणाऱ्या अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवलं. बँकेचा संचालक अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कधी काळी भाजपचं काम करणाऱ्या दिलीप आपेट या व्यावसायिकाने बँकेच्या माध्यमातून लोकांना हा गंडा घातला.


इतर बँकाच्या तुलनेत शुभकल्याण मल्टीस्टेट बँक ठेवीवर जास्त व्याजदर देण्याची ऑफर देत होती. याच भूलथापांना बळी पडून परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये नोकरी करुन निवृत्त झालेल्या शंकर राऊत यांनी आपल्याकडील पेन्शनचे आलेले सगळे 23 लाख रुपये या बँकेत फिक्स केले. सुरुवातीचे तीन-चार महिने व्याज मिळालं. मात्र पुन्हा या बँकेला टाळं लागलं जे अद्याप उघडलेलंच नाही.

कारखान्यातूनही शेतकऱ्यांची फसवणूक

दिलीप आपेट याच्या बँकेसारखीच अवस्था त्याची मालकी असलेल्या शंभू महादेव साखर कारखान्याची आहे. गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या साखर कारखान्याला ऊस दिला, त्या ऊसाचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत. दहा कोटी रुपये थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी साखर कारखाना जप्तीची तयारी दर्शवली आहे. केज तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना जागेवरच पैसे देतो, तुम्ही आमच्याकडे ऊस घाला असं आमिष दाखवलं गेलं. मात्र ऊस जाऊन वर्ष लोटलं तरी एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.



को आहे दिलीप आपेट?

मूळ परळीच्या असलेल्या दिलीप आपेटने 1982 साली वाघाळा साखर कारखान्यावर सुपरवायजर म्हणून काम केलं. त्यानंतर सोलापूर आणि माजलगावच्या साखर कारखान्याचा तो कार्यकारी संचालक बनला.

उस्मानाबादच्या हावरगावमध्ये 2002 साली स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना काढला. दिलीप आपेट याचे भाऊ उमाकांत आपेट हे भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष होते.

दिलीप आपेटसह सगळे संचालक गेल्या अनेक महिन्यापासून फरार आहेत.

शुभकल्याण बँकेवर अंबाजोगाई, परळी आणि माजलगावात गुन्हे दाखल होण्याआधीच दिलीप आपेटने शक्कल लढवली आणि अकरा संचालंकाऐवजी बँकेचे फक्त पाचच संचालक असल्याची नोंदणी दिल्लीत केली. विशेष म्हणजे या पाच संचालकात दिलीप आपेटचा ड्रायव्हर, कारखान्याचा सुरक्षा रक्षक आणि शिपायाचा समावेश आहे. त्यामुळे दिलीप आपेटने शेतकऱ्यांसह सरकारलाही फसवलं.



दरम्यान, दिलीप आपेटच बँकेचा संचालक असल्याचा पुरावाही एबीपी माझाने शोधला. दिलीप आपेट संचालक असलेली यादी स्पष्टपणे सांगते की त्याने सरकारलाही फसवलंय. शिवाय आपण ठेवीदारांची फसवणूक केली नसल्याचं पत्रही स्वतः संचालक या नात्याने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं.



दिलीप आपेटचा भाऊ उमाकांत आपेटने काही महिन्यांपूर्वी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटाचं नाव ‘या टोपी खाली दडलंय काय?’ असं होतं. हा चित्रपट चालला का ते माहित नाही. मात्र, दिलीप आपेटने लोकांना कोट्यवधी रुपयांना घातलेल्या टोपीमुळे आज अनेकांच्या सुखी संसाराला मात्र कायमची घरघर लागली आहे.