पंढरपूर : पंढरपुरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाल्यापासून ही विधानसभेसाठीची पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशातच भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भगीरथ भालके यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांतून केला जात होता. त्यामुळं पक्षासमोरचा पेच वाढला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे तासगाव पॅटर्नप्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होते. तर आधी राष्ट्रवादी निवडणुकीत कोणता उमेदवार उतरवणार हे पाहून त्यानंतरच आपण उमेदवार द्यायचा, अशी रणनीती भाजपनं आखली होती. मात्र, बराच काळ वाट पाहिल्यानंतरही राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केला नसल्यानं भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर अखेरीस राष्ट्रवादीनं भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भगीरथ हे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. 



राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा करत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर केलं. यासंदर्भात जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, "पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत."



स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि धनगर समाजाचे संजय माने यांनी उमेदवारी दाखल करीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली असतानाच आता शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचा झेंडा फडकावत थेट गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश दिला होता. मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य असून महिला वर्गात त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत. 


शिवसेना उमेदवारी देणार नाही याची जाणीव ठेवूनच त्यांनी अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसापासून गावभेटीचा धडाका लावला आहे . आता लोकशाही आघाडीतील उरलेल्या काँग्रेसनेही पंढरपूर जागेवर आपला दावा केला असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी आम्ही निवडणूक लढविणार असल्याचा दावा केल्याने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला या मित्रपक्षातील बंडखोरांची समजूत काढायचे प्रयत्न करावे लागणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pandharpur By Election : सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली