मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता शरद पवार आणि अमित शाह यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुजरात मधील गुप्त भेटीबद्दल उलट-सुलट चर्चा होत असतानाच याबाबत स्वतः अमित शाह यांनी देखील मोठं वक्तव्य काल केलं होतं. त्यानंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. राष्ट्रवादीनं मात्र ही भेट झाल्याचं नाकारलं आहे तर भाजपनं मात्र जरी ही भेट झाली असेल तरी या भेटीत काही गैर नसल्याचं म्हटलं आहे.
सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत- अमित शाह
याबाबत काल अमित शाह यांना पत्रकार परिषदेत शरद पवारांसोबत गुप्त बैठक झाली का? असा प्रश्न विचारला असता शाह यांनी 'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत' असं म्हणत सूचक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी भेट झाल्याचं नाकारलं नाही.
'सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत', शरद पवारांसोबत बैठकीसंदर्भात अमित शाहांचं सूचक वक्तव्य
देशाला याची माहिती असायला हवी- संदीप दीक्षित
काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, "गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचीत झाली हे देशाला कळायला हवं."
अशाप्रकारच्या भेटी होतच असतात- चंद्रकांत पाटील
शरद पवार अमित शाह भेटीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. अमित शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. ही भेट का झाली याबद्दल मी देखील अनभिज्ञ आहे, असं ते म्हणाले.
Nana Patole | शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे तपासण्याची गरज : नाना पटोले
पवार साहेब-अमित शाह भेट झाली नाही- जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पवार साहेब-अमित शाह भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखील आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले की अफवेभोवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही - नवाब मलिक
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुप्त बैठकीच्या बातमीबद्दल म्हटलं की, "गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही. नवाब मलिक म्हणाले की, भाजपवर हल्लाबोल केला. भाजप बैठकीबद्दल अफवा पसरवत आहे. शरद पवार -अमित शाह या दोघांमध्ये कोणतीही बैठक झाली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल जयपूर थेट मुंबईत परतले होते.
अफवांची धुळवड थांबवा- संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचं काय आहे. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर चुकीचं काहीच नाही, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. मात्र नंतर त्या सार्वजिनिक होतात, जसं की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे आजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.