पालघर : विजेत्याला बोकड, उपविजेत्याला सहा गावठी कोंबड्या, तर मॅन ऑफ दि सिरीजला अंड्यांचा ट्रे, पालघरच्या जव्हार तालुक्यातल्या टेनिस क्रिकेट टुर्नामेंटची ही आगळी वेगळी बक्षीसं ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागात उत्पन्न कमी असल्यामुळे ठेवलेली ही बक्षीसं प्रत्यक्षात मात्र स्पर्धकांच्या आकर्षणाचा विषय होती.


जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये क्रिकेटच्या मांसाहारी मनोरंजन चषक 2017 चं  आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे प्रेक्षकांमधून जो कॅच पकडेल त्यालाही बक्षीस म्हणून अंडी दिली गेली.

गावात उत्पनाची साधनं कमी असल्याने क्रिकेट स्पर्धांमध्ये जिंकणाऱ्याला संघाला पैसे देण्याऐवजी मांसाहाराची बक्षीसं ठेवण्यात आली. वेगवेगळ्या गावातून आलेल्या अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

संघाला जिंकवून बोकड मिळवण्याच्या इर्षेने सगळेच संघ खेळले. अखेर दर्यासागर मित्र मंडळ संघाने हा बोकड जिंकला. तर उपविजेता ठरलेल्या रॉयल टीचर इलेव्हन या संघाला या सहा कोंबड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या व्यतिरिक्त चौकार आणि षटकार लगावणाऱ्यांना तितकीच बक्षीस म्हणून देण्यात आली होती.