Palghar News : आर्यन खान (Aryan Khan Drug Case) प्रकरणातील किरण गोसावीला (Kiran Gosavi) केळवे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर मधील दोन तरुणांना नोकरीचं आमिश देऊन लुबाडणूक केल्याप्रकरणी पालघरमधील केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला अटक केल्यानंतर आता केळवे पोलिसांनी काल रात्री किरण गोसावीला ताब्यात घेतलं असून आज न्यायालयात हजर करण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे आणि आदर्श किणी या दोन तरुणांना मलेशिया येथे नोकरी देतो, असं सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. त्यांच्या नवी मुंबई येथील केपी इंटरप्रायजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रं हलवत होता. या दोन मुलांना तिकीट आणि व्हिजा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिजा बनावट असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर, दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. 


तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित असताना पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्यानं त्या दोन्ही तरुणांचा तक्रार अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होता. मात्र आर्यन खान प्रकरण पुढे आल्यानंतर किरण गोसावी पुन्हा चर्चेत आले. 


आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरु असलेल्या बातम्यांमधून आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी पुन्हा चर्चेत आला. उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री त्याला पटली आणि दोन्ही तरुणांनी तात्काळ केळवे पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्थानकात त्यांनी आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, अनेक गुन्हे दाखल असलेल्या गोसावीला एनसीबीनं साक्षीदार बनविल्याच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्यानं एनसीबीचे अधिकारी अडचणीत सापडले होते. त्यातच या प्रकरणात गृह विभागाकडून पालघर पोलिसांवर दबाव वाढत चालल्यानं अखेर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात गुन्हा दाखल झाला होता.